अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

लष्कर भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेला गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात विरोध दिसत आहे. तर अनेक ठिकाणी तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. दरम्यान, आज अग्निपथ योजनेविरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. मात्र, अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. अग्निपथावर वाटचाल अटळ असून बदलच प्रगतीच्या वाटेवर नेतील असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
अग्निपथ योजनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही निर्णय आणि सुधारणा सुरुवातीला चूकीच्या वाटू शकतात, मात्र, हे निर्णय दीर्घकाळासाठी देशाला फायदेशीर ठरतात. आज आम्ही देशातील तरुणांना जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये त्यांची दृष्टी आणि प्रतिभा तपासण्यास सांगत आहोत. जेव्हा सर्वांना समान संधी दिली जाईल तेव्हाच आपण जगाशी स्पर्था करू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
अग्निपथ योजनेविरोधात देशातील अनेक भागांमध्ये तरुण आक्रमक झाली आहेत. तर सोमवारी भारत बंद पुकारला आहे. बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाले असून बंदचा जबर फटका नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारला बसला आहे. मात्र, अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नसल्याच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाम आहेत.
‘मला माझा वेळ वाया घालवायचा नाही’
बंगळुरूच्या विकास प्रकल्पांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जी कामे मागील ४० वर्षांपूर्वी पूर्ण व्हायला हवी होती ती आजपर्यंत प्रलंबित आहेत. आणि आता ही प्रलंबित कामे माझ्या वाट्याला आली आहेत. नागरिकांनी मला संधी दिली असून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. ज्यावेळी बंगळुरूच्या आसपासचा भाग रॅपिड रेल्वेने जोडला जाईल, त्यावेळी सर्व समस्या संपतील, असे ते म्हणाले. तसेच बंगळुरूचा प्रवासही सुकर होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.