Sat. Jul 31st, 2021

AgustaWestland Scam: मिशेलनंतर आणखी 2 आरोपींचे भारतात प्रत्यार्पण

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळयाप्रकरणी दलाल ख्रिश्चिअन मिशेलला अटक करण्यात आल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी आणखी एक आरोपी भारताच्या हाती लागला आहे.

दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेना यांचे दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी दिपक तलवार यांचेही प्रत्यार्पण करण्यात आले आहे.

सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) टीमने एका विशेष विमानाने त्यांना भारतात आणले. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे आणि रॉचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते.

राजीव सक्सेना दुबईत अलिशान घरात राहतात. ईडीकडून त्यांना अनेकदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र त्यांनी तपासात सहकार्य केले नाही.

ईडीने चार्जशीटमध्ये राजीव सक्सेना यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. दुबईतील अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी त्यांना अटक केली.

ईडीने केलेल्या आरोपानुसार राजीव सक्सेना यांच्यासोबत त्यांची पत्नी शिवानी सक्सेनाही घोटाळ्यात सहभागी होती. शिवानी सक्सेना यांनी 2017 मध्ये चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली होती.

सध्या त्या जामीनावर आहेत. तपास यंत्रणांनी दीपक तलवारची नेमकी काय भूमिका आहे याचा तपास सुरु केला तेव्हाच त्याने देशातून बाहेर पळ काढला होता.

राजीव सक्सेना यांचे भारतात प्रत्यार्पण करणे बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांना अटक करण्यात आल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

3 हजार 600 कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणारा ब्रिटीश नागरिक ख्रिश्चिअन मिशेल याला डिसेंबरमध्ये भारतात आणण्यात आले. त्याच्या प्रत्यार्पणाला दुबई कोर्टाने मंजुरी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *