Sat. Oct 1st, 2022

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबाद न्यायालयाने ४९ आरोपींना दोषी ठरवले असून त्यापैकी ३८ दोषींना फाशीचा शिक्षा तर ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये तासभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने १३ वर्षांनी निकाल दिला आहे. त्यानुसार बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा आणि ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ हजार पानांचे आरोपपत्र  दाखल करण्यात आले होते. तर याप्रकरणी आतापर्यंत नऊ न्यायाधीश बदलले आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात विशेष न्यायालयाने निकाल देताना, ७७ पैकी ४९ जणांना दोषी ठरवले तर २८ जणांना निर्दोष घोषित केले.

२६ जुलै २००८ रोजी २१ बॉम्बस्फोट

२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये सायंकाळच्या वेळी २१ बॉम्बस्फोट झाले. मणिनगरमध्ये सायंकाळी ६.४५च्या सुमारास पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर अवघ्या ७० मिनिटांमध्ये २० बॉम्बस्फोट झाले. तर या दुर्घटनेमध्ये ५६ नागरिकांचा मृत्यू झाला असून २००हून अधिक नागरिक जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.