भारतातील 130 कोटी लोक संघासाठी हिंदूच- सरसंघचालक

भारतातील 130 कोटी लोक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी हिंदूच असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हैदराबादमध्ये ते रा.स्व.सं.च्या (RSS) विजय संकल्प सभेत बोलत होते. देशभरात नागरिकता सुधारणा कायद्यावरून (CAA) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचं विधान लक्षवेधी आहे.  

काय म्हणाले सरसंघचालक?

जी व्यक्ती भारताला स्वतःची मातृभूमी मानते,

भारतातील जन, जल, जंगल, जमीन, जनावर यांच्यासह संपूर्ण भारतावर प्रेम करते,

भारताची भक्ती करते, देशाच्या उदात्त संस्कृतीला आपल्या जीवनशैलीत महत्त्वाचं स्थान देतो, ती व्यक्ती संघासाठी हिंदूच आहे.

अशी व्यक्ती भले कोणतीही भाषा बोलत असेल, ती कोणत्याही प्रांतातली असेल, कोणालाही पूजत असेल, तरी ती व्यक्ती भारतमातेचाच पुत्र आहे. अशी व्यक्ती हिंदूच आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भारतातील 130 कोटी जनता हिंदूच (Hindu) आहेत.

नागरिकता सुधारणा कायद्यावरून (CAA) सुरू असलेल्या हिंसक आंदोलन करणाऱ्यांविरोधातही भागवत यांनी सूचक वक्तव्य केलं. ‘काही लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वसामान्यांना एकमेकांशी लढवत आहेत. लोकांना घाबरवत आहेत. मात्र त्यांचं लोकांसमोरचं रूप निराळं आहे आणि खरं रूप वेगळं’ असं भागवत म्हणाले.

हैदराबाद येथील शरुरनगर स्टेडियममध्ये संघाची विजय संकल्प सभा झाली. या सभेला 20,000हून अधिक स्वयंसेवकांनी हजेरी लावली होती.

Exit mobile version