मेळघाटात बालमृत्यू वाढले; तीन महिन्यात ४९ बालकांचा मृत्यू

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सहा वर्षांपर्यंतच्या तब्बल ४९ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यात २९ दिवस ते एक वर्षापर्यंतच्या १७ बालकांचा समावेश आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करत असले तरी या मोठय़ा प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या आदिवासीबहुल मेळघाटात एकूण ३२२ गावे आहेत. हा भाग कुपोषित बालके, बालमृत्यू आणि मातामृत्यू यासाठी नेहमीच चर्चेत असतो. यात जन्माच्या वेळी कमी वजन, कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे, जंतुसंसर्ग, श्वसनदाह, कमी तापमान, अॅन्सपेक्सिया, सेप्टिसिमिया, जन्मजात व्यंग इत्यादी कारणे त्यामागे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
मेळघाटात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ६ वर्षाआतील २१३ बालकांचा मृत्यू
उपजत मृत्यूची संख्या ११३
मेळघाटात १० मातामृत्यू
० ते १ वर्ष वयोगटातील बालमृत्यू- १३०
० ते ७ दिवसाच्या बालकांचा मृत्यू- ८१