Mon. Jan 17th, 2022

मेळघाटातील आदिवासींची लसीकरणाकडे पाठ

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील आदिवासी लोक अंधश्रद्धेपोटी लसीकरण करून घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लस घेतल्याने मृत्यू होतो, अशी खोटी अफवा मेळघाटातील २०० गावांमध्ये पसरल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खोट्या माहितीवर विश्वास ठेवून हे आदिवासी बांधव लस घेण्यास घाबरत आहेत. परिणामी आदिवासींच्या लसीकरणाचा टक्का खूप कमी झाला आहे.एकीकडे शहरात लस घेण्यासाठी गर्दी उसळत असतांना मेळघाटात मात्र चुकीच्या समजांमुळे असं चित्र पाहायला मिळत आहे.

चिखलदरा तालुक्यात आतापर्यंत केवळ १२०० स्थानिकांचे लसीकरण झाले आहे. यात निम्मे फ्रन्टलाइन वर्कर आहेत. लसीबाबत अंधश्रद्धा पसरल्याने जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसीचे ४०० डोस आणण्यात आले होते. नागरिकांना वारंवार आवाहन केल्यानंतर केवळ १७ जणांनी कोरोनाची लस घेतली.त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर त्यांचा सहभाग होता.

उर्वरित ३८० लसी परत गेल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. अंगणवाडी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी या गावागावात फिरून आदिवासींना लसीबाबत जनजागृती करत आहे.मात्र गैरसमजांमुळे येथील आदिवासींनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *