Sun. Apr 5th, 2020

‘या’ चार राज्यात महापुराचं थैमान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार हवाई पाहणी

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात अशा चार राज्यात या पुराचा फटका बसला आहे. यात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या महाराष्ट्रासह आणखी 4 राज्यात महापुराने थैमान घातलं आहे. यामध्ये अनेक शहर, गाव पाण्यात अक्षरश बुडाली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात अशा चार राज्यात या पुराचा फटका बसला आहे. यात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोक या पुरामध्ये अडकले आहेत. लाखो लोकांच स्थलांतर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार आहेत.

चार राज्यात महापुराचं थैमान

महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर मध्ये गंभीर पुरावस्था निर्माण झाली आहे. सांगलीत बोट उलटून 12 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे महाराष्ट्रात एकूण 71 जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यात अजूनही बचावकार्य सुरू आहे. अनेक कुटूबांच यामध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे. हजारो लोक अद्याप या पुरात अडकलेले आहेत.

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तिथेही अनेक भागात पाणी पसरलं आहे. मलप्पुरममध्ये शुक्रवारी दरड कोसळली. केरळमधील गेल्या तीन दिवसांतील मृतांचा आकडा ५७ वर गेला आहे. यातील इतर भागातही मृतदेह आढळले आहेत. तर पुथुमला येथे नऊ जण अद्याप बेपत्ता आहेत.

कर्नाटकमध्ये देखील अशीच अवस्था असून एकूण 35 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या राज्यांची परिस्थीती अत्यंत वाईट असून लष्कराच्या बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगलीची पाहणी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार आहेत. लष्कराच्या बचाव पथकांना मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *