Thu. Jun 17th, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई महापालिकेवर घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला लकवा मारल्याप्रमाणे परिस्थिती आहे. तसेच मुंबई महापालिकेचा कारभार ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबई महापालिकेचे प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकारी प्रत्यक्ष युद्धात न उतरता एसी कार्यालयात बसून ऑनलाइन गप्पा मारण्यात गुंग असल्याने मुंबईत कोरोनाचा कहर वाढत आहे. रुग्णांना वेळेत खाटा न मिळणे, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसेवीर इंजेक्शनचा तुटवडा यामुळे एकूणच मुंबईची आरोग्यव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
‘मुंबईत दररोज कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे आकडे वाढत आहेत, परंतु मुंबई महापालिका आपल्याला कसलेच सोयरसुतक नाही, अशा थाटात वावरत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान कोरोनाची लाट ओसरली अशा भ्रमात मुंबई महापालिका राहिली. टक्केवारी खाऊन अजगरासारखी सुस्त पडलेले महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी अजूनही ढिम्म आणि थंडगार पडले आहेत. आज मुंबई उपनगर आणि शहरातील महापालिका रुग्णालयातील आरोग्यव्यव्यस्थेचा आम्ही आढावा घेतला असता परिस्थिती भयानक आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकडे लक्ष द्यावे’ अशी मागणी करण्यात आली आहे.

‘शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना बूट आणि मोजे खरेदीसाठी निविदा काढण्याची घाई करणाऱ्या मुंबई महापालिकेने वेळेत उपचार मिळत नसलेल्या मुंबईकरांचे जीव वाचवण्यासाठी टेंडरप्रमाणे तत्परता दाखवा, हा आमचा इशारा वजा सूचना आपणाला आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथम आणि द्वितीय वर्गातील महापालिका अधिकाऱ्यांना जागे करण्याची मोहीम सुरू केली जाईल’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड अमोल मातेले यांनी दिला आहे.

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *