अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका

अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांना रविवारी दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला. मिटकरी यांना तात्काळ आयकॉन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वता मिटकरी यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे ह्या अकोला दौऱ्यावर होत्या. अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली,माझ्या मनाची होतीया काहीली’ गायला सुरुवात केल्यावर काही क्षणात त्यांचे तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थितांना होताच तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे मिटकरी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.