‘अनिल देशमुख गेले, आता अनिल परबही जातील’ – किरिट सोमय्या

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. अनिल देशमुख यांची १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने कारवाई करत देशमुखांना अटक केली. यावर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता पुढचा नंबर अनिल परब यांचा असले, असा दावा भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
‘महाविकास आघाडीचा वसुलीचा धंदा बाहेर येईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता अनिल परब यांचासुद्धा नंबर लागेल. तसेच मंत्रीमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील,’ असे वक्तव्य सोमय्या यांनी केले आहे.
किरिट सोमय्या म्हणाले, ‘अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काय विचार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख निर्दोष असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी,’ असे भाजप नेते किरिट सोमय्या म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले होते. त्यावेळ भाजप नेते किरिट सोमय्या यांनी अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याची मागणी करत ठाकरे सरकारवर टीका केली होती.