आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुखांचाच हात; ईडीची उच्च न्यायालयात माहिती

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ईडीने, आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुख यांचाच हात होता. अनिल देशमुख हेच या कटाचे मुख्य सूत्रधार होते. तसेच संपत्ती जमावण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप उच्च न्यायालयात केला आहे.
अनिल देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहारामध्ये हात होता. ऋषिकेश देशमुख, सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्यासोबत रचलेल्या कटाचे मुख्य सूत्रधार अनिल देशमुख आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या करण्यासाठी अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा वापर केला असल्याचा आरोप ईडीने उच्च न्यायालयात केला आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सध्या, अनिल देशमुखांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी विषेश न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर ईडीने उत्तर दिले असून आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुख यांचाच हात असल्याचा आरोप न्यायालयात केला आहे.