Jaimaharashtra news

अनिल परब पत्रकार परिषद : ‘विलिनीकरण होईपर्यंत वेतनवाढीचा निर्णय’

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या १७ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

  परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, संपकारी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी आता न्यायालयात पोहचली आहे. त्यासाठी न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालानंतर एसटी महामंडळाच्या विलिनीकरण्याच्या मागणीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४० टक्क्यांनी वाढ करण्याचा राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

  अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीबाबत आश्वासन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५ हजार रुपयांची वाढ झाली असून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आधी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूरी दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या या निर्णयामुळे राज्य सरकारवर ६००-६५० कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

  विलिनीकरण होईपर्यंत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४० टक्के वाढ करण्यात आली असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. तसेच आंदोलन मागे घेऊन उद्या सकाळपासून कामावर पुन्हा हजर राहण्याचे आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Exit mobile version