‘सोमवारपर्यंत कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार’ – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करूनही राज्यात ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. वेतनवाढीचा निर्णय घेतल्यानंतर काही संपकारी कर्मचारी कामावर रूजू झाले, मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची घोषणा केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली एसटी संपाबाबतची आढावा बैठक पार पडली. या बैठकितून त्यांनी एसटी संपावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाबाबत स्वातंत्र्य निर्णय घेवू शकत नसल्याचे ते म्हणाले. विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत सर्वात मोठे वेतनवाढ करण्यात आले आहे. तरीही कर्माचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अखेरची संधी दिली आहे.
राज्य सरकार सोमवारपर्यंत एसटी कर्मचारी कामावर रूजू होण्याची वाट पाहणार आहे. तसेच सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णयही अनिल परबांनी घेतला आहे. तसेच त्यांना वाढीव पगारवाढ देण्यात येईल. मात्र सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर परतले नाही तर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
संपकारी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येणार नाही परंतु कर्मचारी कामावर आले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही परब म्हणाले. सोमवारीपर्यंत निलंबित केलेले कर्मचारी आणि निलंबित न झालेले कर्मचाऱ्यांनाही कामावर परतण्याचे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. आतापर्यंत १० हजारहून अधिक एसटी क्रमचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई महामंडळान केली आहे. त्यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घोषणेमुळे कर्मचारी पुन्हा कामावर परततील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.