Sun. Jun 13th, 2021

त्यांची चूक काय?

मानवी वस्तीत शिरलेल्या गव्याचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू.

शशांक पाटील , मुंबई :  मानवी वस्तीत शिरलेल्या गव्याचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू. बुधवारी सर्वत्र चाललेली बातमी आणि त्या बातमीचं झालेलं राजकारण. दोन्हीही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना. एका भाबड्या मूक जनावराच्या मृत्युला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही राजकारणी आपल्या लेखणीतून करत आहेत. मुळात याची सुरुवात झाली ती समाज माध्यमांवर. गवा कोथरुडमध्ये शिरला म्हणून तिथले आमदार चंद्रकांत पाटील यांना चिडवण्याचं काम काहीजणांनी समाज माध्यमांवर सुरू केले. या व्हीडिओवर अनेकांनी हव्या तशा पोस्ट व्हायरल केल्या. त्यात आज सामनातून देखील गव्यावर भलामोठा अग्रलेख छापण्यात आला. ज्यात गव्याच्या जाण्याची हळहळ कमी आणि राजकीय आरोपच अधिक आहेत. ‘पुणेकरांनी गव्याला मारुन दाखवले’ अशा संदर्भाच्या लेखामध्ये सुरुवातच चंद्रकांत पाटलांच्या कोथरुड मतदार संघात ही घटना घडली अशी झाली. त्यानंतर दानवे, पदवीधर निवडणूक निकाल असे बरेच राजकीय संदर्भ देत हा आग्रलेख लिहिण्यात आला. मुळात एका प्राण्याच्या मृत्युमुळे त्याला श्रद्धांजली म्हणून हा लेख होता की, गव्याच्या चितेवर आपली राजकीय पोळी भाजण्याचा घाणेरडा प्रयत्न ?


असो राजकारण्यांच्या या राजकारणापेक्षा भाबड्या जीवाच्या मृत्यूबद्दल लिहिणं जास्त संयुक्तिक वाटतंय. मुळात मानवी वस्तीत शिरलेल्या गव्याची चूक काय? अजाणतेपणामुळे मानवी वस्तीत शिरलेल्या गव्याचा मृत्यू म्हणायचा की हत्या? कारण, मनुष्य सध्या दिसेल तिथे हातपाय पसरत अवघ्या पृथ्वीवर आपली मालकी गाजवतोय आणि यात या गव्यासारख्या कितीतरी निष्पाप प्राण्यांचा बळी जातोय. पुण्यातही गव्याला त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी बेशुद्ध करत पकडण्यात आलं. मात्र, दुर्दैवाने बेशुद्ध करण्यात आलेला गवा परत उठलाच नाही, ताम्हणी घाटाकडे नेत असताना त्याने रस्त्यातच श्वास सोडला आणि पहाटेपासून सुरू असलेली त्या भाबड्या जीवाची तगमग थांबली. आता गव्याच्या मृत्युनंतर बरेचजण समाज माध्यमांवर गव्याला ‘आॅनलाईन’ श्रद्धाजंली वाहतायत. पुण्यात गव्याची माफी मागणारे बॅनर तसेच रस्त्यावर रानगव्याची प्रतिकृतीही मुरुडकर झेंडेवाल्यांनी उभारलीये. पण मुळात हे सर्व करण्याला आता काय अर्थ ? ही औपचारिक संवेदनशीलता बचावकार्यादरम्यान नागरिकांनी दाखवली असती, तर कदाचित गव्याचा जीव वाचला असता.

विशेष म्हणजे ही घटना काही पहिली नाही. याआधी अशा अनेक मुक्या जनावरांना चूक नसताना मानवी वस्तीत शिरल्यानं जीवाला मुकावं लागलंय. यात अलिकडची काही प्रकरणं खरंच काळजाला चटका देणारी आहेत. केरळची ती हत्तीण. नकळतपणे मानवी वस्तीजवळ आलेल्या हत्तीणीला फटाके भरलेलं अननस काही नराधमांनी खाऊ घातलं, दुर्देवाने भुकेपोटी त्या गर्भार हत्तीणीने ते खाल्लं देखील त्यानंतर फटाक्यामुळे तिला इतक्या वेदना झाल्या की तीन दिवस ती वेलियार नदीत उभी होती आणि मदतीसाठी आलेलं पथक तिच्यापर्यंत पोहोचू न शकल्यानं हत्तीणीनं सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवलं ज्यामुळे अखेर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अलीकडे आपल्या महाराष्ट्रातलंच एक प्रकरण म्हटलं तर अवनी वाघिणीचं. यवतमाळच्या राळेगांव तालुक्यात थैमान घातलेल्या अवनी जिला टी 1 असं नावही देण्यात आलं होतं. नरभक्षक झाल्यामुळं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला जीवे मारलं. १४ जणांना जीवे मारलेल्या अवनीला ग्रामस्थांच्या भल्यासाठी जीवे मारण्याचे आदेश शासनाने दिलेले. पण या प्रकरणानंतरही एकच प्रश्न समोर येतो, तो म्हणजे अवनीची चूक काय ? मानवाच्या अतिक्रमणामुळे जंगल अपुरं पडू लागलं, शिकार करण्यासाठी पुरेसे प्राणी नसल्यानं वाघासारखे प्राणी मानवी वस्तीत घुसू लागले. त्याचप्रकारे अवनी देखील जंगलातून मानवांत आली आणि जीव गमावून बसली. त्यामुळं चूक अवनीची का मनमानी राज्य करत अतिक्रमण करणाऱ्या मनुष्य प्राण्याची…अशा एक न अनेक घटना दररोज समोर येत असतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी प्रशासन काही करेल का ? हा प्रश्न दररोज समोर येत असतो ज्याचं उत्तर मिळेपर्यंत अशा निष्पाप जनावरांचा बळी जातच राहणार.


(लेखात प्रसिद्ध झालेल्या मतांशी संस्था सहमत असेलच असे नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *