Mon. Jan 17th, 2022

माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील जबाबदार – अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती उपोषणामुळे ढासळली आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला आहे.

तसेच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिलं तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांचे 3.5 किलो वजन कमी झाले आहे.

डॉक्टरांच्या पथकाकडून अण्णांच्या प्रकृतीची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. राळेगणसिद्धीत ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे.

लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग, शेतमालास दीडपट हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी 5 दिवसांपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत.

सरकारी वैद्यकीय पथकाने अण्णांची तपासणी केली. अण्णांच्या यकृतातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढत आहे. बिलिरुबिन हे यकृतातील द्रव्य आहे.

रक्तातील तांबड्या पेशी मृत झाल्यावर बिलिरुबिन तयार होते. उपोषण सुरूच ठेवले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सरकारकडून अण्णांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे राळेगणसिद्धीच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी याविरोधात रास्ता रोको आंदोलन केले, तर पारनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

दरम्यान माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *