Thu. Sep 29th, 2022

‘अण्णा हजारे हे तर केवळ प्यादे, सूत्रधार वेगळाच’

मुंबई : लोकपाल विधेयकासाठी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाबाबत नवं धक्कादायक वक्तव्य करण्यात आलं आहे. संवादक राजू परुळेकर यांचा दावा आहे की, जनलोकपाल आंदोलन संपूर्णपणे हुकूमशाही प्रवृत्तींचे आंदोलन होते आणि त्याला परदेशस्थ भारतीयांचा पाठिंबा होता. परुळेकर यांनी हे विधान ‘न्यूज डंका’ या वेबपोर्टलसाठी दिलेल्या मुलाखतीत केले आहे. न्यूज डंका वेबपोर्टलचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांना दिलेल्या मुलाखतीत परुळेकर म्हणतात, “अण्णा हजारे हे एक प्यादं होतं. तो खेळच वेगळा होता आणि तो खेळ अधिक विस्तृत होता. माझ्यासारख्या माणसाच्या नजरेतून ते सुटणं शक्य नव्हतं. मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा सगळीकडे असं लिहिलेलं की, ‘अण्णा जीवन मे पहली बार झूठ बोलें’. सगळीकडे मुलाखती सुरू झाल्या. मला त्यावेळी राष्ट्रीय राजकारणामध्ये घुसणे शक्य होते. पण, केजरीवाल माझे शत्रू आहेत, हे ही कळत होतं. सगळ्यात भयानक गोष्ट अशी की, काँग्रेसने त्या काळात केजरीवालसोबत युती केली. अमन हॉटेलमध्ये केजरीवाल यांच्यासोबत काँग्रेसची पहिली बैठक झाली. त्यात उद्योगपती होते आणि काँग्रेसचे ३ नेते होते. दिल्लीमध्ये पहिल्यांदा केजरीवालचं सरकार आलं ते त्यामुळेच. याला पवनजी आणि शीला दीक्षित यांचा विरोध होता. मात्र, तरीही काँग्रेसमधल्या एका गटाने ही छुपी युती केली. याचा परिणाम काँग्रेसने नंतर भोगला आणि आजपर्यंत काँग्रेस तो भोगतेय.”

अण्णा आंदोलनाच्या सुरवातीच्या काळात परुळेकर सक्रिय होते. हजारे यांचा ब्लॉग ते लिहीत. याबाबत, खळबळजनक तपशील परुळेकर यांनी समोर आणलाय. मुलाखतीत ते म्हणतात, “अण्णा हजारेंचा फोन आला तेव्हा मी स्लोव्हाकियामध्ये होतो. फोननंतर मी भारतात आलो आणि अण्णा हजारेंचा ब्लॉग सुरू केला. त्यामध्ये अण्णांनीच लिहून दिलेलं एक पत्र होतं. त्यात लिहिलेलं की, अण्णा तत्कालीन सुकाणू समिती बरखास्त करणार आहेत आणि नवीन लोकांना घेणार आहेत. त्या पत्रामुळे, केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण घाबरले. ते अण्णांना सोबत घेऊन गेले आणि अण्णांना मुद्दाम प्रश्न विचारला की, ‘राजू खरं सांगतोय का?’
अण्णा म्हणाले की, ‘नाही, मी राजूला भेटलेलोच नाही. तो हवेत बोलतोय.’
मात्र, दुसऱ्या दिवशी अण्णांनी सही करून दिलेलं पत्र मी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये अपलोड केलं. कारण, तोपर्यंत अण्णांनी मला त्यांच्यावतीने बोलायला सांगितलेलं. अण्णांनी त्यांच्या विचारसरणीबाबत, भूमिकेबाबतचे हक्क मला लिहून दिले आहेत. जे मी आजवर कधी कोणाला दाखवलेले नाहीत.”

राजू परुळेकर यांची मुलाखत चांगलीच स्फोटक झालीय. त्यातल्या नव्या माहितीमुळे ती सध्या चर्चेत आहे. कारण, अण्णा आंदोलन भारतीय लोकशाहीला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसच्या पुढाकारानेच उभारल्याचा आरोप होत होताच त्याला या मुलाखतीतल्या विधानांमुळे बळ मिळालं आहे.

(सिद्धी पाटील)

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.