आणखी एक टोमणेबॉम्ब – देवेंद्र फडणवीस

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले तसेच विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी भाषणातील ९० टक्के विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. ‘देवेंद्र फडणवीस तुम्ही जर तिथे गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी खाली आली असती, अशा बोचऱ्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. तसेच भाजपाला सोडले म्हणजे गाढवाला सोडले, अशी टीकाही शिवसेना पक्षप्रमुखांनी फडणवीसांवर केली.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत प्रत्युत्तर देत त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. फडणवीसांनी ट्विट केले की, ‘सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट हा तर निघाला… आणखी एक ‘#टोमणा बॉम्ब’…’ असे लिहिले आहे. तसेच ‘जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा’, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
सर्वत्र पळापळ अन् गदारोळ,
नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत,
सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट हा तर निघाला…
आणखी एक ‘ #टोमणे बॉम्ब’…जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा !!!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2022
तसेच, मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासकामाबाबतही भाष्य केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही. तसेच जनसंघाने संयुक्त महाराष्ट्र समिती फोडली असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावर फडणवीसांनी ट्विट केले की, ‘मुंबईची मेट्रो-३ आम्ही तीन वर्षांत ८० टक्के पूर्ण केली. एकच काम होते जे ९ महिन्यात पूर्ण व्हायचे होते. पण, सरकारने सर्व कामे थांबविली. पण, आता पुढचे ४ वर्ष ही आशियातील सर्वात मोठी मेट्रो खोळंबली. मुंबईकर योग्यवेळी त्यांना शिक्षा देणारच’, असे फडणवीस म्हणाले.
मुंबईची मेट्रो-3 आम्ही तीन वर्षांत 80 टक्के पूर्ण केली.
एकच काम होते, जे 9 महिन्यांत पूर्ण व्हायचे होते. पण, सरकारने सर्व कामे थांबविली.
पण, आता पुढचे 4 वर्ष ही आशियातील सर्वांत मोठी मेट्रो खोळंबली.
मुंबईकर योग्यवेळी त्यांना शिक्षा देणारच!#Mumbai #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2022
‘फडणवीस बाबरीच्या सहलीला गेले होते का?’
मुख्यमंत्री म्हणाले, ‘बाबरी तुम्ही पाडली नाही. बाबरी आमच्या शिवसैनिकांनी पाडली. हे आम्ही अभिमानाने सांगतो. तुम्ही म्हणता बाबरी आम्ही पाडली, फडणवीस बाबरीच्या सहलीला गेले होते का? की चला चला बाबरी पाडायला चला’, असा घणाघातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला आहे.