टाळ-मृदंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण उत्साहात

मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा येथे पार पडले. यावेळी हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला आहे.

रिंगण सोहळा उत्साहात

माळशिरस येथील मुक्काम आटोपून सोमवारी सकाळी माउलींच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे मार्गक्रमण होत असताना वाटेत खुडूस फाटय़ाजवळ दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला.

सकाळी आठ वाजताच पालखीचे रिंगणस्थळावर आगमन झाले होते. संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा झाल्यानंतर मध्यभागी पालखी विराजमान झाली.

नंतर पालखी सोहळा प्रमुखांनी इशारा करताच रिंगण सुरू झाले. अश्वाच्या धावण्याची गती पाहून वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला.

रिंगण सोहळा पार पडताच अवघा आसमंत माउलींच्या नामघोषाने दुमदुमला. यावेळी वारकरी मंडळींनी टाळ-मृदंगाचा गजर करीत अक्षरश: आनंद लुटला.

स्त्री-पुरुष वारकऱ्यांनी झिम्मा फुगडय़ांचा खेळ मांडला. वारकऱ्यांनी उंचच्या उंच मनोरे उभे करून सर्वाचे लक्ष वेधले.

टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर वारकऱ्यांनी फेर धरून उडय़ा मारत, नाचत आपला हा सोहळा अनुभवला आहे.

Exit mobile version