आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

भाजप नेते आशिष शेलार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
आशिष शेलारांनी सांगितले की, दिवाळीनिमित्त आमची भेट ठरली होती. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जगभरातील १०० सर्वोत्कृष्ठ सिनेमांवरील ‘द बुक ऑन मुव्ही’ हे पुस्तक मी वाचले होते. ते पुस्तक मला आवडले. त्यामुळे मी हे पुस्तक राज ठाकरेंना भेट म्हणून दिले आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप या पक्षांमध्ये युतीची चर्चा रंगली होती. त्यामुळे आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे आशिष शेलार यांनी सांगितले.