धक्कादायक ! घटस्फोटीत महिलेवर जीवघेणा हल्ला

एका विवाहित महिलेवर डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून बीड जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी पेठ बीडमध्ये घडली आहे.
सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव असल्याचे जखमी महिलेने सांगितले. पीडित महिला बीड शहरातील पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी भागात राहते. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली.
यावेळी पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की मागील एक वर्षापासून सुनील दत्तात्रय जाधव हा मुलगा मला छेडछाड करत होता. यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याला आम्ही तक्रार दिली होती. पोलिसांनी सुनील जाधव यांना पोलिस ठाण्यात बोलावून एक वेळा समजावूनही सांगितले आहे. तरी देखील तो माझी सतत छेड काढत आहे. त्याच्या छेडछाडीमुळे मी माझे ब्युटी पार्लरचे क्लास देखील अर्ध्यावर सोडलेले आहेत.
मारहाण झालेल्या महिलेचे लग्न झालेले असून तिचा रीतसर घटस्फोट देखील झालेला आहे. आता ती तिच्या वडिलांकडे राहते. ‘मागील एक वर्षभरापासून सुनील जाधव हा माझ्या मुलीला सतत छेडतो व आता तर त्याने डोक्यात दगड घालून मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मुलीच्या जीवास धोका असून याची दखल बीड पोलिसांनी घ्यावी, अशी मागणीही संबंधित जखमी महिलेच्या वडिलांनी केली आहे.
महिलेवर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सुनिल जाधवच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर या आरोपीने पळ काढला होता.
मात्र काही तासात तपासाचे चक्र फिरवत आरोपी सुनिल जाधव याला बीड पोलिसांनी अटक केली. आता या आरोपीवर पोलीस काय कठोर कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.