Thu. May 6th, 2021

‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच या काळात सर्वसामान्यांसाठी मदतीचीही घोषणा केली. दरम्यान, ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, ‘’मुख्यमंत्री महोदयांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते?’’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत अपुरी असल्याचे सांगत अतुल भातखळकर म्हणाले की, ‘’मध्यमवर्ग, दुकानदार, केशकर्तनालय, बारा बलुतेदार असे कित्येक लोक मदतीपासून वंचित राहणार. यांचा विचार कोणी करायचा. मुळात ज्यांना मदत दिली तीही अपुरी, इतरांना तर साफ वाऱ्यावर सोडलंय. त्यांना मदत का मिळाली नाही ? की मनात येईल ते बोलायचं आणि मनाला वाटेल ते करायचं सगळाच सावळा गोंधळ सुरू आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, काल रात्री राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्यांना मदत या पोटी ५४७६ कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदत मागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *