बाबासाहेबांचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार – मुख्यमंत्री

मुंबई : परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते.

यानंतर उद्धव ठाकरेंनी बाबासाहेबांच्या परळमधील जुन्या निवासस्थानी भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळमधील दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळीतील दुसर्‍या मजल्यावर राहायचे. बाबासाहेबांनी 1912 ते 1934 एकूण 22 वर्षे या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यामुळे बाबासाहेबांचा सर्वाधिक सहवास या ठिकाणी राहिला. याच घराला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.

यावेळी बाबासाहेबांच्या निवासस्थानाचं राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बीआयटी चाळीचं स्मारकात रुपांतर करण्याची मागणी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

Exit mobile version