Wed. Apr 14th, 2021

बहुप्रतीक्षित हॉरर चित्रपट ‘बळी’ च्या मोशन पोस्टरचे केले अनावरण

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार प्रस्तुतकर्ता असलेल्या आणि जीसिम्सची निर्मिती असलेल्या नवीन व बहुप्रतीक्षित अशा ‘बळी’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे आज 4 मार्च २०२१ रोजी अनावरण
करण्यात आले. ‘बळी’ या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांचे असून स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत आहे. बहुप्रतीक्षित ‘बळी’ चित्रपट १६ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार.

आज प्रसिद्ध झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तींचा भीतीदायक चेहरा रक्त आणि डोळ्यांत क्रॉसच्या प्रतिमांचा वातावरण दर्शविले गेले आहे. हे भीतीदायक पटकथेची जाणीव देते ती (एलिझाबेथ कोण आहे) च्या टॅग लाइनसह , त्यातून अघटीत आणि भितीपूर्ण वातावरणाचे सुतोवाच होते. त्यातून या चित्रपटाची कथा आणि पटकथा भीतीदायक असेल, याची कल्पना येते आणि त्यातून प्रेक्षकांना काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर अनुभवता येतील याची खुणगाठ बांधता येते.

या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-२’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाले, “लपाछपी’ला मराठी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांना हॉरर चित्रपट आवडतात, हे दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिसादाला दाद म्हणून मी मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवित राहायचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.”

ते पुढे म्हणतात, “अर्जुन आणि कार्तिक यांच्यासारखे उत्तम निर्माते या माझ्या दुसऱ्या हॉरर चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटासाठी मला स्वप्निलसारखा स्टार मिळाला आहे. त्याला मराठी प्रेक्षकांकडून नेहमीच चांगले प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते की, एक अभिनेता म्हणून स्वप्नीलची प्रतिभा आतापर्यंत म्हणावी तशी वापरली गेली नाही. त्याला भेटल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की, तो या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. त्याशिवाय तो एक स्टार आहे आणि त्यामुळे आमचा हा चित्रपट सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला मदतसुद्धा होईल. ‘बळी’ हा ‘लपाछपी’पेक्षाही अधिक भीतीदायक आणि थ्रिलिंग असेल, अशी हमी मी प्रेक्षकांना देवू शकतो.”

या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”

तो पुढे म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”

“बळी’च्या माध्यमातून आम्हाला नवीन प्रकार हाताळायला मिळतो आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. हॉरर चित्रपट म्हटला की विशाल फुरियापेक्षा आणखी चांगला पर्याय काय असू शकतो? त्यांचा ‘लपाछपी’ हा अलीकडच्या काळातील एक सर्वोत्तम हॉरर चित्रपट आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटक्षेत्रातील एक सर्वोत्तम नट स्वप्निल जोशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्यासाठीसुद्धा वेगळा प्रकार हाताळण्याची ही एक संधी होती,” असे उद्गार निर्माते आणि जीसिम्सचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *