Sun. Jun 20th, 2021

‘ती’… घराची वेस ओलांडताना, वेशीचं रक्षण करताना…

तिचा उंबरठयापासून ते अवकाशापर्यंत प्रवास मांडताना खूप गर्व वाटतो. आता ‘ ती ’ कुणी एकटी नसून ‘ती’ आज सर्व क्षेत्र पादाक्रांत करणारी, स्वतःचं अस्तित्व निर्माण ‘स्त्री’ होय. प्रत्येक स्त्रीचा संघर्ष म्हणजे एक प्रेरणादायी प्रवासच… तिच्या संघर्षाला सुरुवात होते, ते तिला कुमकुवत समजल्या जाणाऱ्या समाजाला आपलं कर्तृत्व दाखवून देण्यापासून. जेव्हा तिच्यातला स्वाभिमान आणि तिच्या कर्तृत्वाचा अभिमान एकवटतो तेव्हा एक सावित्री जन्माला येते. पारंपरेचे उंबरठे ओलांडून ती शिक्षिका, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पत्रकार, वैमानिक,अभिनेत्री अशी सर्वव्यापी बनतेय. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. यातलचं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे पोलीस खातं…

पोलीस खात्यातील महिलांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. रुढार्थाने कणखर पुरुषांचं मानल्या जाणार्या पोलीस खात्यात आता महिलाही आपलं वर्चस्व निर्माण करतायत. 1973 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केरळमध्ये पहिलं महिला पोलीस स्टेशन स्थापन केलं. त्यानंतर आता महिला पोलीस खात्यात आपलं अधिराज्य स्थापित करत आहे. जेवढं धाडस पोलीस खात्यातील पुरुष कर्मचारी दाखवत आहेत. तेवढंच धाडस स्त्री कर्मचाऱ्यांनीही दाखवलं आहे.

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जशी ही स्त्री पुरुषांच्या बरोबरीने चालत आहे. तसंच काहीसं या पोलीस खात्यामध्ये देखील दिसून आलंय. या खात्यामध्ये अशा कितीतरी स्त्रियांचा समावेश आहे, ज्यांनी शत्रूला न जुमानता स्वबळावर कर्तव्य बजावलं आहे.

‘ती’ची भरारी…

किरण बेदी भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरल्या आहेत. तिहार जेलचा त्यांनी केलेला कायापालट त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो.

मीरा बोरवणकर या 1981 च्या बॅचमधून IPS अधिकारी झाल्या. बॉलीवूडचा “मर्दानी” हा चित्रपट मीरा यांच्याच आयुष्यावर आधारित आहे.

सोनिया नारंग ह्या 2002 च्या बॅचमधून IPS अधिकारी बनल्या. त्या सध्या बँगलोरमध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा स्पष्टवक्ता  स्वभाव आणि त्यांच्या कामातील एकाग्रता यांमुळे त्या ओळखल्या जातात. 2006 मध्ये त्यांनी एकदा हिंसक निदर्शनाच्या दरम्यान कर्नाटकाच्या एका आमदाराला कानाखाली मारली होती.

संजुक्ता ह्या आसाममधून 2006 च्या बॅचमध्ये आयपीएस अधिकारी बनल्या. आसाममधील बोडो अतिरेक्यांच्या दहशतवादाला त्यांनी आळा घातला. त्यांनी 16 अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय.  फक्त 15 महिन्यांमध्ये 64 दहशतवाद्यांना अटक केली.

अपराजिता राय ह्या सिक्कीममधून पहिल्या गोरखा अधिकारी बनल्या. त्यांनी ‘बेस्ट लेडी आउटबाउंड प्रोबेशनर’चा पुरस्कार पटकावला आहे. फील्ड कॉम्बॅटसाठी त्यांना उमेशचंद्र ट्रॉफी मिळाली आहे.

मरीन ह्या 2012 च्या बॅचमधून IPS अधिकारी झाल्या. त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये UPSC ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली. लोकांना मदत करण्यासाठी त्या फोनमार्फत 24 तास उपलब्ध असतात.

सौम्या संभूशिवन ह्या 2009 च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी बनल्या. संभूशिवन ह्या हिमाचल प्रदेशमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सौम्या यांनी आपल्या समर्पण आणि प्रामाणिकपणा याच्यामुळे निर्भय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

तरीही…

या कणखर, खंबीर आणि पुरुषांच्या बरोबरीने ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ चा वसा जपणाऱ्या महिला पोलिसांना महिला म्हणून करावा लागणारा संघर्ष संपलाय का? तर नाही… त्यांचं कर्तृत्व जेवढं भव्य आहे, त्यांची कामगिरी जेवढी दिव्य आहे, त्याहून जास्त त्यांचा संघर्ष आहे. गुन्हेगारांना बेड्या ठोकणाऱ्या महिला पोलिसांना अजूनही स्वतःला अनेक बेड्या तोडायच्या आहेत.

पोलीस म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या  महिलांची चोवीस तास ड्युटी करताना कुचंबणा होत असते.

गर्दी आवरताना अनेकदा लोकांकडून हिणकस शेरेबाजी होत असते.  त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं.

तासंतास बंदोबस्तावर तैनात असताना स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सोयीपासूनही त्या वंचित असतात.

‘चुल आणि मुल’ हा रुढींचा उंबरठा ओलांडून घराच्या नव्हे, तर शहराच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या महिला पोलिसांचे ड्युटीवर असताना  खाण्याचेही अक्षरशः हाल होतात.

सणासुदीच्या उत्सवी वातावरणात जेव्हा घराघरांतल्या गृहलक्ष्मी आपल्या कुटुंबासह ठेवणीतला पोषाख परिधान करून आनंद साजरा करत असतात, तेव्हा रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकींमध्ये कोणतीही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी या पोलीस रणरागिणी बारीक लक्ष ठेवण्यासाठी घराबाहेर असतात. रात्रभर ड्युटी करताना पहाटेपर्यंत किमान एका ठिकाणी बसता येईल, अशी जागाही अनेकदा मिळत नाही.

अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत महिला पोलिस खंबीरपणे बंदोबस्तासाठी सज्ज असतात. गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी महिला पोलिसांची नेमणूक असते. मिरवणुकीत गोंधळ झाल्यास सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना वेगवेगळे पाइंट नेमून दिलेले असतात. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांना २४ तासांहून अधिक वेळ बंदोबस्त करावा लागतो. कितीही त्रास झाला, तरी त्याकडे दुर्लक्ष करत पोलीस बंदोबस्तास सज्ज असतात.

दुर्गेचं बळ, मातृत्वाला झळ?

महिला पोलिसांच्या अनेक अडचणींपैकी एक महत्त्वाची अडचण म्हणजे आपल्या नवजात अर्भकांना न्याय देण्यात येणारी समस्या…

स्तनदा महिला पोलिसांना आपल्या तीन – चार महिन्यांच्या बाळाला घरी सोडून duty करावी लागते.

या महिलांच्या मुलांसाठी कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये पाळणाघराची व्यवस्था नाहीय, जेणेकरून त्या आपल्या चिमुकल्या मुलांना आईच दूध देऊ शकतील.

यामुळे त्या लहान मुलांचा तर नुकसान होतंच, परंतु पुढे जाऊन आईलाही स्तनांच्या आजारांना सामोर जावं लागतं.

महिला पोलिसांना स्वतःच्या कुटुंबाला पुरेसा वेळही देता येत नाही.

वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ यामुळे महिला पोलीस त्रस्त आहेत.

सर्वांचे रक्षण करणाऱ्या या महिला पोलीस स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र असुरक्षितच आहेत.

सगळ्या अडचणींना तोंड देवून अविरत सेवा करण्याऱ्या या महिला पोलिसांना जागतिक महिला दिनानिमित्त सलाम …………..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *