Mon. Oct 25th, 2021

एअर स्ट्राईकमुळे भाजपाच्या जागांमध्ये वाढ ?

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्याचा मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

टाइम्स नाऊ आणि व्हिएमआर यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, बालाकोट हवाई हल्ल्यानंतर एनडीएला 13 जागांचा फायदा होणार आहे.

हल्ल्यापूर्वी एनडीला 270 जागा मिळणार असल्याचे सर्वेक्षणात दाखवण्यात आले होते.

मात्र 5 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीदरम्यान केल्या गेलेल्या सर्वेक्षणात या आकड्यात वाढ होऊन तो 283 वर पोहोचला आहे.

14 फेब्रुवारी या दिवशी झालेल्या पुलवामात दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी या दिवशी पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला होता.

या हल्ल्यामुळे एकीकडे एनडीएच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत असताना, दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या जागांचा आकडा 135 पर्यंतच थांबला आहे.

हवाई हल्ल्यापूर्वी काँग्रेस आणि मित्रपक्षांना 144 जागा दाखवण्यात आल्या होत्या.

एवढेच नाही तर देशातील तिसऱ्या आघाडीतील पक्षांच्या जागाही कमी होताना दिसत आहेत. हवाई हल्ल्यापूर्वी तिसऱ्या आघाडीला 129 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

हवाई हल्ल्यानंतर मात्र त्यांना 4 जागांचे नुकसान होणार आहे.

यामुळे तिसऱ्या आघाडीचा जागांचा आकडा 125वर येऊन थांबला आहे.

तिसऱ्या आघाडीत बीजू जनता दल, तृणमूल काँग्रेस, तेलुगू देसम, तेलंगण राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त, समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल एकत्र निवडणुका लढवत आहेत.

एअर स्ट्राईकनंतर यूपीत भाजपला सर्वाधिक लाभ

हवाई दलाने बालाकोटामध्ये हवाई हल्ला केल्यानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाला फटका बसू शकतो.

तर दुसरीकडे एनडीएला उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये फायदा होऊ शकतो.

एनडीएला सर्वात जास्त यूपीत 3 जागांचा फायदा मिळू शकतो. हवाई हल्ल्यापूर्वी उत्तर प्रदेशात भाजपला 39 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता मात्र हा आकडा 42 वर गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *