Wed. Jun 23rd, 2021

भारत बायोटेक कंपनी ८५ लाख लशींचा पुरवठा करणार

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा असल्याने आरोग्य विभागाने यासाठी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला तातडीने लस पुरवठा करण्यासाठी पत्र लिहिले होते. यातील हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने ६०० रुपये दराने ८५ लाख लसीच्या डोसेसचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे, तर सीरमने अद्याप उत्तर दिलेले नाही.

१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम केंद्र सरकारने जाहीर केला असून महाराष्ट्रात एकूण १२ कोटी लसीचे डोसेस द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे सिमर इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कोरोना लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सोमवारी २६ एप्रिल रोजी राज्याच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवून तातडीने लस पुरवठा करण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सीरम व भारत बायोटेक कंपनीला लस पुरवठा तात्काळ करण्यासाठी पत्र दिले. या पत्रात किती रुपये दराने लस देणार व पुरवठा कशाप्रकारे करणार अशी विचारणा केली आहे. २६ एप्रिलला पाठवलेल्या या पत्राला भारत बायोटेकने लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ एप्रिलला उत्तर दिले आहे. या पत्रात भारत बायोटेकने ६०० रुपये प्रति वायल दराने ८५ लाख कोव्हॅक्सिन लशींचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे.

मे महिन्यात ५ लाख लशींचा पुरवठा केला जाईल. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात प्रत्येकी १० लाख लशी तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी २० लाख लशींचा पुरवठा केला जाईल, असे भारत बायोटेकच्या विक्री विभागाचे प्रमुख एम. सुब्बाराव यांनी आरोग्य विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. ही व्यवस्था तात्पुरती असून ही कमी किंवा वाढू ही शकते असेही या पत्रात नमूद केले आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *