भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थी नाशिकच्या रामकुंडात विसर्जित

भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या अस्थींचे आज विसर्जन करण्यात आले. नाशिकच्या रामकुंडात लता दीदींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. हृदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते लती दीदींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच रामकुंडावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
लता दीदींच्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, ‘माझी बहीण नाही, माझी आई होती ती. तिच्या अस्थी आज येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत. उत्तम मुहूर्तावर, चांगली पूजा पार पडली. यावेळी सर्वांनी मनापासून आर्शीवाद दिले, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.’
भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ९३व्या वर्षी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. देशातील स्वर्गीय सुर हरपल्यामुळे संपूर्ण देशात शोक व्यक्त होत आहे.