Sat. Sep 18th, 2021

‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातून अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी केलं अटक!

बिग बॉस मराठीमध्ये भांडण, तंटे आणि वाद कोणत्या थराला जातील याचा नेम नसतो. मात्र बिग बॉसच्या घरात आज चक्क वेगळाच ड्रामा घडला. बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धक अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणवणारा अभिजित बिचुकले सातारा भागातील बहुचर्चित राजकारणी आहे.

गेल्या 20 वर्षांत नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका बिचुकलेंनी लढवल्या आहेत.

थेट राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केल्यामुळे अभिजित बिचुकले चर्चेत आले होते.

त्यामुळेच बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येण्याची संधी त्यांना मिळाली.

बिग बॉसच्या घरातही हरेक प्रकारे चर्चेत राहण्याचा प्रयत्न बिचुकले करत होते.

वादग्रस्त विधानं करणं, आपल्या विजयाचं बाहेर सेटिंग करून ठेवल्याचं वारंवार सांगणं, महिलांशी flirting करणं यांमुळे अभिजित बिचुकले चर्चेत राहत होते.

काही दिवसांपूर्वी घरातील सदस्य रूपाली हिच्याशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भांडल्यामुळे बिचुकले वादात सापडले होते.

त्याच्याविरोधात महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.

मात्र आता त्यांना वेगळ्याच कारणासाठी अटक करण्यात आलं आहे.

एक  चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी मुंबईत येऊन बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातून अटक केलं आहे.

बिग बॉसच्या घरात येऊन अशा प्रकारे स्पर्धकाला अटक करून घेऊन जाण्याची घटना बिग बॉस मराठीच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.

यापूर्वी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिला घरातील नियम वारंवार मोडल्याबद्दल आणि गैरवर्तनाबद्दल बिग बॉसच्या घरातून हाकलून लावण्यात आलं होतं. तो वाद शमतो न् शमतो तोच अभिजित बिचुकलेंनाही अशा प्रकारे पोलिसांनीच कारवाई करत घराबाहेर काढत ताब्यात घेतल्यामुळे बिग बॉसचा दुसरा सिझनही चांगलाच वादग्रस्त ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *