बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोना बाधीत

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागानेही मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोनाबाधित असल्याची पुष्टी केली आहे. सध्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून चांगली नव्हती. असे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले. सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली, त्यात ते कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. मुख्यमंत्र्यांवर एसओपी अंतर्गत उपचार सुरू असून सध्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक आहे.
नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. तेव्हापासून भाजपवरील नाराजीमुळे नितीश या कार्यक्रमांना हजर नसल्याच्या अंदाज लावला जात होता. मात्र, आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.