Wed. Oct 27th, 2021

वापरलेली इंजेक्शन, सुई विक्री करून पैसे कमवण्याचा धंदा?

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

 

आता एक बातमी मुंबईकरांच्या आरोग्याशी निगडीत आहे. तुम्ही रुग्णालयात वापरत असलेल्या इंजेक्शन, सुया, सलाईन बॉटल्स या सुयोग्य स्थितीत आहेत का? कारण मुंबई पालिका रुग्णालयातील जैविक कचऱ्यातील इंजेक्शन, सुया पुनर्वापरासाठी विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरेंनी केला आहे.

 

हरकतीच्या मुद्द्याद्वारे सुधार समितीमध्ये विठ्ठल लोकरेंनी हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे मुंबई पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करतेय का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 2008पासून मुंबई पालिका रुग्णालयातील जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं कंत्राट एका कंपनीला देण्यात आलं आहे. या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे आवश्यक असतानाही, ती योग्य रितीने होत नसल्याचा आरोपदेखील लोकरेंनी केला आहे.

 

पैसा कमवण्याच्या हव्यासापायी करण्यात येत असलेला जैविक कचऱ्यातील इंजेक्शन-सुयांचा पुनर्वापर नागरिकांच्या आरोग्यासाठी फारच घातक आहे. या धक्कादायक प्रकाराकडे काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरेंनी लक्ष वेधलं आहे. तर संबंधितांवर कारवाई व्हावी आणि जैविक कचरा टाकण्याची जागा तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *