Mon. Jan 17th, 2022

‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे’

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने केलेल्या जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने हा आरोप केला असून ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत आरोप फेटाळले आहेत.

याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या टीकेला ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

‘सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!’, असा इशारा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

‘लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही’,असंही म्हटलं आहे. तसेच ‘शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे’, असंही भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीनखरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला. त्याबाबत चंपत राय यांनी निवेदन प्रसृत करत, ‘गेले १०० वर्ष आमच्यावर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल’, असं चंपत राय यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *