‘सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या’

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यासोबतच केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

‘सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या , मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकतं यासंदर्भात विचार करायला हवा. ५० टक्क्यांवरचं आरक्षण राज्याने दिलं होतं. त्यामुळे याविरोधात केंद्र सरकार कशी पुनर्विचार याचिका करेल?’, असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

‘आपलं अपयश लपवण्यासाठी प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. मी केंद्राचं अभिनंदन करेन की इतक्या वेगानं ही भूमिका मांडली. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागलं आहे’, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Exit mobile version