Thu. Sep 29th, 2022

‘कोणालाही अटक होऊ शकते’; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

नाशिक: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी ईडीकडून सध्या राजकीय नेत्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. ईडीच्या कारवाईवर बोलताना त्यांनी रात्रीतून बड्या नेत्याला अटक होऊ शकते असे विधान करत खळबळ उडवून दिली.

‘ईडी स्वायत्त संस्था आहे. ती केंद्राच्या अखत्यारित काम करते. त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र, रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सकाळी पुन्हा माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी यावे लागू शकते’, असे पाटील यांनी जाता जाता पत्रकारांना मिश्कीलपणे सांगितले. त्यामुळे नेमक्या कोणत्या नेत्याला अटक होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

तसेच, ‘मनसे जोपर्यंत परप्रांतीयांसंदर्भात आपले धोरण बदलत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी युती शक्य नाही. मात्र, राजकारणात काहीही घडू शकते’, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचं कौतुकदेखील केलंय. ‘राज ठाकरे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व आहे. मात्र, ते एकटे राज्यात एकहाती सत्ता आणू शकत नाहीत’, असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘पंकजाताई नव्हे, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज’

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठविण्यात आल्याबद्दल त्यांना विचारणा केली असता, केवळ मुंडेच नव्हे तर अनियमित कारभार करणाऱ्या राज्यातील ९० टक्के कारखान्यांवर कारवाई होत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पंकजाताई नव्हे, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज असून, कारखान्याला बजावण्यात आलेली नोटीस आणि नाराजीचा संबंध नसल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.