Fri. Jul 30th, 2021

‘मुख्यमंत्री केवळ भाषण आणि सूचना देण्यात व्यग्र’

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दररोज मोठ्या संख्येने रूग्ण आढळून येत आहेत. तुलनेत रूग्णालयांमधील खाटांची उपलब्धता कमी असल्याने, अनेक रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. तर, प्रशासनदेखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये तर खाटा न मिळाल्याने एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. राज्याच्या अनेक भागांमधून ४-५ तास प्रवास करूनही रुग्णांना बेड्स मिळणं अशक्य झालं आहे. रुग्णांचे होणारे हाल पाहून ठाकरे सरकारने आतातरी काही ‘हाल’चाल करावी.” असं भाजपाने म्हटलं आहे.“ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासेल अशी भीती व्यक्त होत होतीच. नाशिकमध्ये बाबासाहेब कोळे या कोरोनाग्रस्ताचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने पत्राद्वारे मांडलेली व्यथा तुमच्या जिव्हारी लागू दे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.” असं देखील भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ भाषण आणि सूचना देण्यात व्यग्र आहेत. मात्र राज्यातील वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा त्यांना विसर पडलाय. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, औषधे, खाटा नाहीत. त्याबद्दल काही ठोस पावलं उचलण्याची तयारी ते करू शकले असते. पण त्यांनी ती केली नाही! ” असं भाजपने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *