Fri. Sep 30th, 2022

“इंधन दरवाढीला काँग्रेसच जबाबदार!” दानवेंचा अजब आरोप

दररोज इंधन दरवाढ असल्याची वस्तुस्थिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मान्य केली. मात्र या इंधन दरवाढीला काँग्रेसच जवाबदार असल्याचा अजब आरोपदेखील दानवे यांनी केला आहे. ते आज नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

 

इंधन GST कक्षेत आणल्यास इंधन दर आटोक्यात येणं शक्य आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यातील अर्थमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील दानवे यांनी दिली. तसंच लोकसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात लवकरच शिवसेनेसोबत बैठक आणि चर्चा करणार असल्याचंदेखील दानवे यांनी सांगितलं.

इंधन दरवाढीविरोधात विरोधकांनी केलेल्या आंदोलनाबद्दल विचारलं असता आंदोलन करत सरकारवर आरोप करणं हे विरोधकांचं कामच असल्याचं दानवे यांनी म्हटलं. काही महिन्यांपूर्वी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र राज्यातील ज्या भागातून हे हल्लाबोल आंदोलन केलं गेलं, त्या सर्व भागात झालेल्या महापालिका आणि इतर सर्व स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपला यश मिळालं आहे. त्यामुळे या ‘संघर्ष यात्रे’ने फार काही फरक पडणार नाही, असं म्हणत काँग्रेसच्या संघर्ष यात्रेची दानवे यांनी खिल्ली उडवली.

 

राज्यात कितीही आघाड्या झाल्या तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या चार वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर झाला नाही. केंद्रात आणि राज्यात एक स्वच्छ प्रतिमेचं सरकार आम्ही दिलं आहे. त्यामुळे विरोधकांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार त्यांनी केला. तसंच राफेल डील काँग्रेस काळातच झालेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस नेतेच यात सापडतील असंदेखील दानवे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.