Wed. Jun 26th, 2019

फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रविक्री, भाजप पदाधिकाऱ्याला अटक

0Shares

फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराला कल्याण गुन्हे अन्वेषणने अटक केली आहे. धनंजय कुलकर्णी असं या दुकानदाराचे नाव असून तो डोंबिवली पूर्वेतील भाजपचा पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी रात्री दुकानावर धाड टाकून धनंजयला कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.

मानपाडा रोड परिसरात असणाऱ्या ‘तपस्या हाऊस ऑफ फॅशन’ या नावाच्या दुकानातून धनंजय फॅशनेबल वस्तूंची विक्री करतो. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती.

कसं पकडलं शस्त्रास्त्रं विक्रेत्याला?

बोगस गिऱ्हाईक पाठवून कल्याण गुन्हे अन्वेषण पथकाने प्रथम शस्त्रास्त्रंविक्रीची खात्री केली.

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक धाड टाकली.

त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेली शस्त्रे विक्रीसाठी ठेवल्याचे पाहून पोलीसही अवाक झाले.

रात्रभर दुकानाची झाडाझडती घेतल्यानंतर पोलिसांनी 62 स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स,

38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि एक एयरगनसह मोबाइल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे.

आरोपी धनंजय कुलकर्णी हा कर्जबाजारी झाला आहे.

गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून सदर दुकानात शस्त्रास्त्रे विक्री करत आल्याचेही समोर आले असून ही शस्त्रे त्याने मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, तसेच पंजाब, राजस्थान राज्यातून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

राष्ट्रवादीचा हल्लाबोल

दरम्यान या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. आगामी निवडणुकीसाठी विरोधकांना धमकवण्यासाठी हा शस्त्रसाठा ठेवलाय का असा संशय डोंबिवली माजीसभापती आणि ज्येष्ठ नागरिक वंडारशेठ पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. आज या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही मुख्यमंत्र्यांचा नावे उत्तर द्या म्हणून पत्रकही काढलं.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: