Tue. Oct 26th, 2021

‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू’

मुंबई: शिवसेनेकडून राम मंदिरासंदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवन येथे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले. त्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला सज्जड इशारा दिला आहे. ‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल’, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

शिवसेना भवनासमोर सेना-भाजपमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी ‘मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर जशास तसे उत्तर दिलं जाईल. भाजपच्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल’, असा इशारा दिला आहे.

दरम्यान राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ‘शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कवच घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमच्या आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही’, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

‘राम मंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना, आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम’, असं ट्वीट करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *