साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?; भाजपानं उडवली राज ठाकरेंची खिल्ली

राज्य सरकारवर व्यंगचित्रातून वारंवार निशाणा साधणाऱ्या मनसे अध्यक्ष ठाकरेंना आता भाजपाने व्यंगचित्रातून प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपानेही व्यंगचित्र काढून प्रत्त्युतर दिलं आहे. विधानसभा, लोकसभा जवळ आली असतानासुद्धा राज ठाकरे कार्टून काढण्यात व्यस्त असल्याची खिल्ली या व्यंगचित्रातून उडवली आहे. एकंदरीतच राज ठाकरे आणि भाजपामध्ये पुढच्या काळात हा कार्टूनवॉर रंगत जाणार असंच दिसतंय. महाराष्ट्र भाजपानं ट्विटरवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.
भाजपाने या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंची जोरदार खिल्ली उडवली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाही राज ठाकरे व्यंगचित्र रेखाटण्यात मग्न आहेत, असं व्यंगचित्र भाजपानं प्रसिद्ध केलं आहे. ‘साहेब, लोकसभा निवडणूक जवळ आली!’, ‘साहेब, विधानसभा निवडणूक जवळ आली!’, असं मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंना सांगत असतानाही मनसेप्रमुख व्यंगचित्र काढण्यात व्यस्त आहेत. यानंतर कार्यकर्ते ‘साहेब, आपल्याला एकही जागा जिंकता आली नाही’, असंही राज ठाकरेंना सांगताना दाखवण्यात आले आहेत. मात्र तरीही राज ठाकरे व्यंगचित्र काढण्यात गढून गेले आहेत. ते कार्यकर्त्यांकडे पाहतदेखील नाहीत, असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्र भाजपाने प्रसिद्ध केलेलं हे व्यंगचित्र अनेकांनी रिट्विट केलं आहे. भाजपाने या व्यंगचित्रासोबतच साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?, असा प्रश्न विचारला आहे.