Wed. Dec 8th, 2021

राहुल गांधींच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच, लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं गेलं नाही तर कोरोनाच्या अनेक लाटा येतच राहातील, असा इशारा देखील दिला आहे.

‘अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं मोदींनी करोनाविरुद्ध विजय घोषित केला. त्यांनी करोनाला हरवलं असल्याचं जाहीर केलं. मात्र अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही’, असं राहुल गांधी म्हणाले.

‘सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क हे तात्पुरते उपाय असून लस हा कायमचा उपाय आहे. जर तुम्ही विषाणूला भारतात रोखलं नाही. तर घातक बनेल’, असं देखील राहुल गांधींनी बोलून दाखवलं.

‘राहुल गांधींची पत्रकार परिषद ही टूलकिटच्या स्क्रिप्टनुसार झाली’

राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही टूलकिटच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या टीकेचं खंडन केलं आहे.

जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला नौटंकी वगैरे शब्द वापरुन देशाच्या जनतेचा अपमान केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ‘आम्हाला नौटंकीसारखे शब्द वापरायचे नाहीत. पण त्यांची नौटंकी जनतेनं कधीच बंद केली आहे’, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

‘त्यांचा मुख्य मुद्दा होता की लसीकरण हा एकच उपाय आहे. आम्हीही कित्येक दिवसांपासून तेच म्हणत आहोत. देशाने लसींची निर्मिती केली. कोवॅक्सिन या संपूर्ण भारतीय बनावटीच्या लसीची निर्मिती केली तेव्हा काँग्रेसवाले त्यावर शंका उपस्थित करत होते. लस घेऊ नका सांगत होते. लसींबद्दल संशय, भ्रम तयार करत होते. ही काँग्रेसची रणनीती आहे. पण पंतप्रधान मोदींनी लस घेतल्यावर हे कोवॅक्सिनवर निर्माण झालेले प्रश्न बंद झाले. तेव्हा राहुलजी, लसीला विरोध तुम्ही केला आहे’, असं म्हणत जावडेकर यांनी राहुल गांधींच्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *