Tue. Aug 3rd, 2021

मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळत असून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यातआरोप प्रत्यारोप सुरु आहेत. छत्रपती संभाजीराजे भोसले यानना न भेटणारे मोदी कंगना आणि प्रियंकाला कोणत्या प्रश्नावर चर्चेसाठी भेटले असा सवाल सावंत यांनी विचारला होता. त्यावर मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान आम्हाला भाजपला शिकवू नका असं प्रत्युत्तर दरेकरांनी दिलं होतं. आता गुरुवारी आपण भाजपची पोलखोल करणार असल्याचा इशारा सावंतांनी दिला. त्यावरही दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रवीण दरेकर आणि भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू’, असं ट्वीट केलं.

सचिन सावंतांच्या ट्विटला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युतर दिलं आहे. ‘ज्यांच्यासाठी बाजू मांडताय त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल. ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात! बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या’, असं प्रत्युत्तर दरेकर यांनी दिलं आहे.

‘राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!’, असं प्रत्युत्तर दरेकर यांनी दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *