Fri. Aug 6th, 2021

‘छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपला शिकवू नका’

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या वादात आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याच्या मुद्द्याची भर पडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली. त्यांच्या टीकेला आता विधानपरिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा आणि कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं आहे’, अशी टीका सावंत यांनी केली होती.

सचिन सावंत यांच्या टीकेला विधानपरिषद विरोधी पक्षनेते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात! मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका! आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा!’, असं ट्विट करत प्रविण दरेकर यांनी सचिन सावंत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *