Mon. Jul 4th, 2022

आमदार निलंबन प्रकरणी विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन

आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. विधानसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन काल करण्यात आले .विधानसभेत भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केल्यानंतर आज नागपूर आणि पुण्यात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे तर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार आक्रमक होऊन घोषणाबाजी करत आहेत. या १२ आमदारांचे निलंबन लोकशाहीच्या विरोधात आहे, तसेच ते नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांचं निलंबन परत घेण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपुरच्या बडकस चौकात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करत आहे .

त्यामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावन्नकुळे सामील झाले होते.तसेच ‘आमचा आवाज बंद होऊ शकत नाही आमचं आंदोलन सुरूच राहणार’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत सरकारचा पुतळाही जाळण्यात आला. या पुतळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काल तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचे फोटो लावण्यात आले होते. पुतळा दहन करताना भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.