Sat. May 25th, 2019

बरकतीसाठी घरात कवटी, कळव्यातील धक्कादायक प्रकार उघड

42Shares

जादूटोण्यावर कायद्याने बंदी असूनही कळव्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आर्थिक भरभराटीसाठी मानवी कवटी आणून ठेवणाऱ्या कळव्यातील एका व्यक्तीसह उल्हासनगरमधील पुजारी आणि स्मशानभूमीत काम करणारा एक कर्मचारी अशा तिघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी एकूण दोन मानवी कवट्या आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

नेमकं काय घडलं ?

कळव्यातील मफतलाल झोपडपट्टी येथील फक्रुद्दीन चाळीतील एका खोलीत मानवी कवटी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळवा पोलिसांनी शुक्रवारी अचानक या खोलीमध्ये धाड टाकली.

यावेळी खोलीत एक कवटी सापडली. राजू रामअवतार शर्मा वय वर्ष 45 यानेच ही कवटी घरात आणून ठेवली होती.

केटरर्सच्या कामानंतर सलूनचा व्यवसाय उघडूनही भरभराट होत नव्हती.

त्याचदरम्यान कामानिमित्त शर्मा उल्हासनगरला गेला होता.

त्यावेळी उल्हासनगरमधील महाराज तथा पुजारी कैलास बाबूलाल हटकर याच्याशी शर्माची ओळख झाली होती.

घरात मानवी कवटी ठेवल्यास भरभराट येईल, तसेच त्रासही कमी होईल असे त्याला सांगण्यात आले होते.

त्यानंतर शर्माने पुजाऱ्याकडून 6 हजार रुपयांमध्ये मानवी कवटी घेतली होती.

मागील 3 महिन्यांपासून ही कवटी शर्माच्या घरात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षकांनी  दिली आहे.

शर्मा याला ताब्यात घेतल्यानंतर पुजारी हटकर यालाही अटक करण्यात आली. हटकर याच्याकडूनही आणखी एक कवटी जप्त करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले.

हटकरने ही कवटी उल्हासनगर येथील पांडुरंग गवारी याच्याकडून प्राप्त केली होती.

पोलिसांनी गवारी यालाही बेड्या ठोकल्या असून पोलिसांनीच दिलेल्या तक्रारीनंतर कळवा पोलिस ठाण्यात महराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानवी कवटीचं उल्हासनगर कनेक्शन

मानवी कवटीचे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर जप्त कवट्या नेमक्या कोठून आणल्या जात आहेत, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

शेवटी कवट्याचे उल्हासनगरमधील खेमानी याठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचे कनेक्शन पुढे आले.

आरोपी पांडुरंग गवारी हा मागील 30 वर्षांपासून या स्मशानभूमीत काम करत असून त्यानेच स्मशानभूमीत पुरलेल्या कवट्या काढून पुजारी हटकर याला दिलेल्या होत्या, अशी माहिती पोलिस उप निरीक्षकांनी दिली.

पोलिसांच्या कारवाईनंतर एक कवटी शर्मा याच्या घरात आणि दुसरी कवटी ही पुजाऱ्याकडे पोलिसांना मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *