जम्मूतील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला, हिजबुलच्या एकाला अटक

जम्मूतील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात ग्रेनेड फेकणाऱ्या आरोपीला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे.
हिजबुलचा यासीर अरहान असे या आरोपीचे नाव आहे.
यासीर हा कुलगाम येथील रहिवासी आहे.
यासीर पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
नेमकं काय घडलं ?
जम्मूमध्ये बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. बसच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला.
सकाळी 11.30 च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.
ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा बस स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
हल्ल्यात 18 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्याचे नेमके कारण तसेच कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता याचा तपास घेतला जात आहे.
जम्मू बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते. याशिवाय इतर राज्यांसाठीही येथून बस सोडल्या जातात.
सकाळची वेळ असल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी होती. यावेळी ग्रेनेड फेकण्यात आला ज्यामध्ये 18 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला होता.
जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.