तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण स्फोट, पाच जणांचा मृत्यू

पालघरमधील तारापूर औदयोगिक क्षेत्रात भीषण स्फोट झाला आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की चार ते पाच किलोमीटरचा परिसर हादरुन निघाला.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारा नायट्रेट कंपनीत हा भीषण स्फोट झाला. स्फोटाचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पोहचल्या.
या घटनेत 7 जण गंभीररित्या जखमी झाले. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच काही कामगार अडकल्याची भीती देखील आहे. जखमींना स्थानिक तुंगा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटाच्या हादऱ्यामुळे जवळील निर्माणाधीन इमारत कोसळली. यावरुन हा स्फोट किती भीषण होता, याचा अंदाज येऊ शकतो.