Tue. Jan 18th, 2022

वारी चुकू न दे हरी

महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि अखिल वारकरी संप्रदायाची माऊली म्हणजे पंढरीचा विठुराया. आषाढी वारी पालखी सोहळा म्हणजे वारकऱ्यांचा जीव की प्राण. दरवर्षी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत ज्ञानोबा-तुकोबा महाराजांच्यासह इतर पालख्याही पंढरपुरात दाखल होतात. पण मागीलवर्षी देशावर कोरोनाचं सावट असल्यामुळे आषाढी वारी रद्द झाली. इतिहास घडला. आषाढी पायी वारी चुकली. वारकरी हळहळला. विठ्ठल भक्तांच्या आनंदावर विरजण पडलं. पण, अशा परिस्थितीतही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने सर्व पालख्या शासकीय नियमानुसार पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाल्या आणि परंपरा कायम राखण्याचा सोपस्कार पार पडला.

या सोपस्काराची रुखरुख मनात ठेवत माऊलींच्या भेटीची आस बाळगून वैष्णव पुढल्या वर्षापर्यंत थांबले. मात्र, यंदादेखील कोरोनाचे सावट कायम असताना वारी होणार की नाही हा प्रश्न उभा ठाकलाय. वारकऱ्यांनी आता मात्र कुठल्याही परिस्थितीत वारी होणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. ‘वारकऱ्यांच्या भावनेचा आदर करून शासनाने मर्यादित स्वरूपात वारी पायी चालायला परवानगी द्यावी’, अशी प्रतिक्रिया पंढरपुरच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या विश्वस्त ऍड.माधवी निगडे यांनी ‘जय महाराष्ट्र’कडे व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, ‘गेल्या वर्षी फक्त पांडुरंगाची भेट झाली. पण, वारीचा आनंद घेता आला नाही .शासन नियमानुसार आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. पण, यंदा वारीला परवानगी द्यावीच.’ अशी विनंती संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प रघुनाथबुवा गोसावी यांनी ‘जय महाराष्ट्र’शी बोलताना मांडलीय.

या आग्रहामुळे यंदा वारी सोहळा होणार का? वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन आणि वारी सोहळा आनंदात साजरा करता येणार का? हे प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे. पालखी सोहळ्यावरून प्रसंगी वारकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून वारकऱ्यांनी लसीकरण केल्यास पायी वारी शक्य होईल अशीही चर्चा ऐकू येत आहे.

यंदाच्या आषाढी वारीच्या प्रश्नाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण, आता सरकार या प्रश्नावर काय निर्णय घेतंय याकडे माऊलींचे भक्त डोळे लावून बसलेत. वारकरी संप्रदायासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्षही याकडे लागले आहे. मागीलवर्षी राज्यावरील कोरोनाचं सावट लक्षात घेऊन वारकऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी न होऊन प्रशासनाला सहकार्य केलं. त्यापूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या निर्णयाची घोषणा केली होती. मात्र, ‘यंदा वारकरी पालखी सोहळ्याला सशर्त परवानगी द्या’, असा आग्रह धरत असताना उपमुख्यमंत्र्यांनी मात्र ‘निर्णय मुख्यमंत्री घेतील’ अशी भूमिका घेतली आहे. अजित पवारांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर्षी तरी राज्य सरकार वारकऱ्यांच्या भावना समजून घेईल? यंदा तरी सरकार वारकऱ्यांचं ऐकेल की दुसऱ्यांदाही पायी वारी चुकणार? अशा प्रश्नांचे काहूर वारकऱ्यांच्या मनात माजलं आहे. त्यातच, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातूनच काय ते स्पष्ट होणार असल्याने धाकधूक वाढली आहे.

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

(लेखकाच्या मताशी व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. लेखकाची मते स्वतंत्र आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *