कांताबाई- तमाशा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत

महाराष्ट्राला लोककलेचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र एकविसाव्या शतकात जगताना आणि ‘आधुनिक’ संकल्पनेच्या नावाखाली गप्पा मारताना लोकसंस्कृती कोणत्या कोपऱ्यात बाजूला पडली हे काही कळेना! मात्र आजही काही कलाकार मंडळी लोककला जपण्याचं काम जीव ओतून करत आहेत.

आजच्या काळात हातात मोबाईल नावाचं असणारं मनोरंजनाचं साधन आणि घरोघरी असणारे टीव्ही यामुळे आजची नवी पिढी लोककला, लोकनृत्य, नाटके, तमाशा या संज्ञेशी अपरिचित आहेत. हे लिहिण्याचा खटाटोप करण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वीच झालेलं निधन! कांताबाई सातारकर या तमाशा विश्वातील बहुआयामी व्यक्तिमत्वाची एक्झिट म्हणजे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रावर शोककळा आहे.

मनोरंजनाची आधुनिक साधने ज्या काळात येऊ लागली, तमाशा आता संपणार आणि आपल्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार अशी भीती ज्या वेळेस कलाकारांना वाटू लागली, त्याच वेळेस कांताबाई सातारकर यांनी तमाशा या लोककलेमध्ये बदल करत आणि अनोखे प्रयोग करत तमाशा जिवंत ठेवला. त्यांनी नुसता तमाशा जिवंतच ठेवला नाही, तर हजारो कलाकारांच्या पोटापाण्याची चिंतासुद्धा मिटवली.

गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील तिंबा या गावात १९३९ साली कांताबईंचा जन्म झाला. मुळात तमाशाचा कोणताही वारसा नसलेलं त्यांचं घराणं. सातारा या त्यांच्या मूळ गावी आल्यानंतर कांताबाई यांना नवझंकार या मेळ्यात नृत्य करण्याची संधी वयाच्या नवव्या वर्षी मिळाली आणि कांताबाईंचा ‘एक कलाकार’ म्हणून प्रवास सुरू झाला. तमाशासम्राट तुकाराम खेडकर यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून ‘तुकाराम आणि कांताबाई’ ही जोडी महाराष्ट्राच्या तमाशा विश्वात लोकप्रिय झाली.

मराठी कलामंचावर ज्यावेळी पुरुष कलाकार हे ‘स्री’ची भूमिका साकारायला लागले, त्याच वेळेस कांताबाई यांनी चक्क स्री असून पुरुषाची भूमिका साकारली. वगनाट्य या कलाप्रकारामध्ये तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या हुबेहूब भूमिका साकारल्या आणि तमाशा विश्वात असेच नवनवीन प्रयोग करत तमाशा ही लोककला कांताबाई यांनी जिवंत ठेवली. त्यांच्या द्रष्ट्या भूमिकेमुळे कलाकारांची उपजीविका सुरु राहिली.

अनेकदा त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते मंडळींकडून विचारणा देखील झाली. मात्र मी चित्रपटात येऊन माझ्या तमाशामधील कलावंतांना वाऱ्यावर सोडणार नाही, हीच भूमिका कांताबाई यांची वेळोवेळी घेतली.

तमाशाकडे ‘अश्लीलता’ म्हणून पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन कांताबाई यांच्यामुळे बदलला गेला आणि दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी त्यांच्या तमाशा या लोककलेचा सन्मान झाला.आता रघुवीर खेडकर त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. अहमदनगरच्या संगमनेर या कलानगरात त्यांनी तमाशाचा विस्तार करण्याचं कार्य सुरू ठेवलं.

कांताबाई यांच्या कलाकारीची छाप तमाशा विश्वात अनोखीच होती. म्हणूनच कांताबाई ह्या केवळ तमाशा उभ्या करणाऱ्या नाही, तर ‘तमाशा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत’ अशी त्यांची ओळख आहे.

– शुभम शिंदे

(लेखकाच्या मताशी व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. लेखकाची मते स्वतंत्र आहेत.)

Exit mobile version