वाढत्या रुग्णसंख्येबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालयं पंचतारांकित हॉटेल्सचा वापर करणार आहेत. आजपासून दोन हॉटेल्समध्ये खासगी रुग्णालयाचा भाग म्हणून काम सुरु होणार आहे.

जास्तीत जास्त रुग्णांना उपचार देण्यासाठी खासगी रुग्णालयं पंचतारांकित हॉटेल्ससोबत हातमिळवणी करणार आहेत. यामुळे ज्यांची प्रकृती गंभीर नाही त्यांना खासगी रुग्णालयातून हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. मात्र ही प्रक्रिया करण्याआधी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संमती आवश्यक असणार आहे.

हॉटेल्स खासगी रुग्णालयांचा विस्तारित भाग म्हणून कार्यरत असतील. हॉटेल्सना कोरोना रुग्णांसाठी २० खोल्यांची गरज असून २४ तास डॉक्टर, नर्स, औषधं आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल. या सुविधेसाठी रुग्णालये चार हजारांपर्यंतचं शुल्क आकारु शकतात. जर रुग्णासोबत कोणी राहत असेल तर हे शुल्क सहा हजारांपर्यंत असेल.

कोरोनाची लक्षणं नसणारेही या सुविधेचा वापर करु शकतात. ज्यांना खरंच खाटांची गरज आहे त्यांना ते उपलब्ध व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक ठिकाणी खाटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यादरम्यान पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयांमध्ये तात्काळ वैद्यकीय उपचाराची गरज नसणारे रुग्णही खाटा अडवून ठेवत असल्याचं समोर आलं आहे. अशा रुग्णांसाठी वेगळ्या सुविधांवर प्रभावी आणि पुरेसे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

Exit mobile version