Sun. Jun 20th, 2021

मुंबई महापालिकेकडून कोरोनाच्या नावाखाली लाखोंचा खर्च?

मुंबईत सिनेमागृह बंद असताना, तसेच एसटी बसेसशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सिनेमागृहात प्रिंट स्लाईड असो किंवा एसटी बसेस पॅनल फुलरॅपच्या कोव्हिड जाहिरातीच्या क्रिएटिव्हवर 30 लाख खर्च केले आहेत.

कोणतीही निविदा न काढता महाराष्ट्र शासनाच्या एका पत्रावर एका खाजगी जाहिरात कंपनीला कोव्हिडच्या नावाखाली लाखोंचा खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन उजेडात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या जनसंपर्क विभागास कोव्हिडच्या जाहिराती अंतर्गत क्रिएटिव्हवर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती विचारली होती. जनसंपर्क विभागाने अनिल गलगली यांस मेसर्स कन्सेप्ट कम्युनिकेशन प्रा. लि. तर्फे 24 मार्च 2021 रोजी सादर केलेले रु 30.97 लाखांचे बिलाची प्रत दिली. या बिलात एकूण 6 वेगवेगळी अशी क्रिएटिव्ह बाबत शुल्क उल्लेखित आहे.

सिनेमागृहात प्रिंट स्लाईड क्रिएटिव्ह 3 भाषेत असून यासाठी 7 लाख 87 हजार 500 रुपये शुल्क आकारले आहे. एसटी बसेस पॅनल फुलरॅपच्या क्रिएटिव्ह 5 भाषेत असून यासाठी 5.25 लाख शुल्क आकारले आहे. होर्डिंग्जची क्रिएटिव्ह 5 भाषेत असून यासाठी 2 लाख 62 हजार 500 रुपये शुल्क आकारले आहे. अजून एका होर्डिंग्जची क्रिएटिव्ह 5 भाषेत असून यासाठी 2 लाख 62 हजार 500 रुपये शुल्क आकारले आहे. प्रिंटच्या 5 भाषेतील क्रिएटिव्हसाठी 25 जाहिरातींवर 5.25 लाख शुल्क आकारले आहे तर बॅनरच्या 5 भाषेतील 10 क्रिएटिव्हसाठी 2 लाख 62 हजार 500 रुपये शुल्क आकारले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची निविदा जारी केल्या नाहीत आणि आयुक्तांच्या मंजुरीवर कार्यादेश जारी केले. या कामासाठी 2 वेगवेगळे कार्यादेश जारी झाले असून एक कार्यादेश 19 ऑक्टोबर 2020 रोजी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या मार्फत आहे तर दुसरा कार्यादेश बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *