Fri. Sep 30th, 2022

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बूटपॉलिश आंदोलन

वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलविण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रद्दीवाला, बूट पॉलीश वाला, डिलीव्हरी बॉय अशाप्रकारचे प्रतिकात्मक रुप घेत राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.‘गद्दारांना ५० खोके, महाराष्ट्राला देतात धोके’,‘ ईडी सरकार हायहाय’,‘गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी’ अशाप्रकारची घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, आम्हाला एकच आश्वासन होते की, वेदांत कंपनीचा सेमीकंडक्टर कारखाना राज्यात येईल आणि तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. परंतु हा प्रकल्प गुजरातला हलवल्याने तरुणांना बुट पॉलिश करण्याची वेळ आली आहे. वेदांत ग्रुपचा उद्योग गुजरातच्या देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.

एक ते दीड लाख रोजगार निर्मिती या उद्योगामुळे राज्यात होणार होती परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील तरुणांचा रोजगार हिरावला गेल्याने बेरोजगार होण्याची पाळी तरुणांवर आली आहे. राज्यातील सरकार हे निगरगट्ट सरकार असून त्याला जनतेची दया येत नाही. आंदोलनाच्या माध्यमातून तरुण- तरुणींना एकत्रित करण्याचे काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून करत आहे

1 thought on “पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बूटपॉलिश आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.